पहिला पाऊस, ट्रेन आणि त्याचे प्रेम..
रात्र जरा बेधुंद होती, वाराही मस्त वाहत होता, आभाळात ढगांचा आणि चांदण्यांचा लपाछपीचा खेळ जणू सुरु होता. तो प्लॅटफॉर्म नं. 4 वर उभा राहून ट्रेनची वाट बघत होता, त्याने त्याचे मनगट वर केले, घड्याळात पाहिले, 9.30 झाले होते. अंधेरी स्टेशन वरून घरी जायला त्याला 9.31 ची ट्रेन होती. ट्रेन येतेय हे त्याला लांबून दिसले, त्याने मागे अडकवलेली बॅग पुढे केली जणू सगळी शस्त्र गोळा करून लढण्याच्या तयारीला सज्ज झाला आहे. ट्रेन येणार इतक्यात त्याच्या घामाने डबडबलेल्या चेहऱ्यावर पावसाचे थेंब पडू लागले, पाऊस सुरु झाला होता. त्या थंड वाटणाऱ्या पावसाच्या थेंबांनी त्याला खूप बरे वाटले. तेवढ्यात ट्रेन आली त्याच्यासारख्या कित्येक प्रवाश्यांची ट्रेन मध्ये चढण्यासाठी लढाई सुरु झाली. तो चढला, त्या 2 - 3 सेकंदात त्याने पूर्ण डब्ब्यात नजर फिरवली आणि एक विंडो सीट त्याला रिकामी दिसली जसे काही स्वर्गच भेटले या अविर्भावात तो त्या सीट वर जाऊन बसला. ट्रेन सुरु झाली आणि त्याने बॅगेतून हेडफोन्स काढले, ते मोबाइलला कनेक्ट करून गाणी ऐकू लागला. पाऊस सुरूच होता.. वाराही सुटला होता.. काही थेंब अधून - मधून अंगाव...