कसरत तारेवरची आणि गमतीची..




आरे बापरे!! 8 वाजून गेले, ऑफिस सुटायची वेळ निघून गेलीय, मी घाई - गडबडीत फ्रेश होऊन, ऑफिसातून निघालो.. नेहमीची बस मिळेल कि नाही या विचारात चालत असताना, मागे पहिले तर सिग्नल वर मला बस उभी आहे हे दिसले. जरा हायसे वाटले. मी स्टॉप वर तसाच थांबलो, जरा आभाळाकडे लक्ष गेले वारा सुटला होता, आणि आभाळ चमकत होते, अगोदरच खूप वेळ त्या स्टॉप वर वाट पाहणारा एक माणूस मला म्हणाला, बाळा विजा चमकत आहेत पाऊस येईल बघ आज. बस आली मी बस मध्ये मोठ्या दिमाखात प्रवेश केला आणि एक  विंडो सीट पकडली, माझ्या मागे तो माणूस बस मध्ये चढला आणि तोही माझ्याच बाजूला येऊन बसला. मी तिकीट काढले, त्यांनीही तिकीट काढले, मी खिडकीतून बाहेर बघत होतो, मनात कुणाची तरी आठवण घोळत होती, आणि डोक्यात कुणाचे तरी विचार येत होते. बस स्टॉप वर स्टॉप घेत स्टेशन च्या दिशेने निघाली होती, तेवढ्यात माझ्या बाजूला बसलेला माणूस मला म्हणाला, "बाळा मी म्हणलो हुतो ना पाऊस येल ते" " विजा बी चमकत  हुत्या" मी म्हणालो "आरे हो काका खरंच इकडे पाऊस पडायला सुरुवात झालीये" किती मस्त वाटतेय बघा, रात्रीचे ते सुके रस्ते आज पावसाच्या पाण्याने भिजून गेल्याने चमकत होते.
  मला पहिला पाऊस खूप आवडतो, आणि त्याच्यामुळे मातीला येणारा तो सुगंध तर लाजवाब.. तेवढ्यात बस स्टेशन ला पोहचली मी उतरलो. एक टप्पा पूर्ण केला होता, आणखी एक टप्पा बाकी होता, म्हणजे आजून ट्रेन पकडून घरी जायाचे होते. घड्याळात पाहीले 8.45 म्हणजे 5 मिनिट बाकी आहेत, मी धावलोच ट्रेन पकडण्यासाठी, ट्रेन भेटली पण बसायला जागा भेटली नाही, निदान उभे तरी व्यवस्थित होतो, गर्दी तशी कमी होती. ट्रेन सुरु झाली.  ट्रेन मधले सगळे प्रवासी मोबाईल काढून गेम वैगरे खेळतात तसे मी पण माझा मोबाईल खिशातून बाहेर काढून उगाचच त्याच्याकडे पाहिले आणि तसाच खिशात ठेवला, कंटाळा म्हणून नाही तर चार्जिंग कमी होती. आणि मुख्य म्हणजे पुढे मला सीट भेटल्यावर एक - दोन गाणी ऐकायची होती म्हणून.. पुढे एका माणसाने मला बसायला जागा दिली, मी एक गाणे मोबाईल वर लावले पण डोळे ओले झाले कुणाच्या तरी आठवणीने.. मोबाईल बंद करून मी डोळे बंद करून झोपण्याचा केविलवाणा प्रयत्न करू लागलो. पुढे ट्रेन आमच्या स्टेशन ला पोहचली एकदाची. मी उतरलो आणि सरळ घराकडे गेलो.
    घरी आल्या - आल्या , घामाने ओलेचिंब झालेले कपडे काढून पहिले आंघोळ करून घेतली, आई तर  अगोदरच गावाला गेली आहे, मग वहिनीने जेवण वाढून दिले. जेवण झाल्यावर मी पेपर वाचत बसलो. दादा - वहिनी आणि भाऊ आणि दादाचा मुलगा - आमचा छोटा "गुड्डू" हे सकाळी गावाला जाणार होते, मग घरी फक्त आणि फक्त मीच उरणार होतो. मी अंथरुणावर पडलो, हवेत जरा गारवा होता, मोबाईल चेक केले , मेसेज वाचले आणि तसाच झोपी गेलो. पहाटेचे 4 वाजले, दादा वैगरे गावाला जायाला निघाले होते, सकाळी 5.15 ला ते निघाले मी दरवाज्यापर्यंत त्यांना सोडून आलो. मोबाईल मध्ये एका एंजल चा चेहरा पाहिला आणि पुन्हा झोपलो. आज उठवायला कोण न्हवते ना आई होती ना वहिनी.. सकाळ झाली मी उठलो आणि बघतो तर काय 8.15 झाले होते, म्हणजे तब्बल 15 मिनिटे लेट. तसाच धावत वॉशरूम मध्ये गेलो, पाणी चेक केले, आणि गॅस पेटवून एकीकडे चहा आणि दुसरीकडे अंडी उकडत ठेवली, चहाचे भांडे तडतडायला लागले कारण त्याच्यात पाणीच टाकायला विसरलो होतो, पाणी टाकले आणि फिल्टर चालू केला, तिकडे बाथरूम मध्ये बादली भरत लावली, आणि मी अंडी आणि चहाकडे लक्ष देऊ लागलो, पाहतो तर काय फिल्टर पाण्याने ओव्हरफ्लो  झाला आणि तिकडे बादली फुल भरून वाहत होती, लगेच फिल्टरचे बटन बंद केले, बाथरूम मधला नळ बंद केला, इकडे चहा आणि अंडी कसेबसे झाले होते, मी रात्रीचे उरलेले जेवण गरम करायला लागलो आणि मनात विचार आला हे देवा मला 3 - 4 हात दिले असतेस तर किती पटकन कामे झाली असती, पण क्षणात एक विचार चमकून गेला " आई एवढे सगळे कसे एकटीच करते विना तक्रार" ह्या विचारात असताना घड्याळात 8.50 झाले होते, आरे बापरे! अंघोळ राहिलीये आता उशीर होईल, नेहमीची ट्रेन मिळणार नाही ह्या भीतीनेच अंघोळ पण कशीबशी उरकली, शर्टाला इस्त्री मारून पटापट सगळे आवरून मी रेडी होतो, आता घड्याळात  पाहिले  9.12 झाले होते, माझा माझ्यावर विश्वासच बसत न्हवता, एवढ्या वेळेत मी कसे काय सगळे उरकले. मी लढाई जिंकली होती. मी ऑफिसला जाण्यासाठी निघालो, दारे - खिडक्या बंद करून घराची चावी आमच्या समोर राहणाऱ्या "कुलकर्णी" काकांकडे दिली.
   बाहेर आलो तर मौसम सुहाना होता, पावसाच्या ढगांनी आभाळ भरून आले होते. वारा मस्त वाहत होता  कसे भारी वाटत होते, मला तिची आठवण येत होती.. माझ्या मित्राने मला स्टेशन पर्यंत लिफ्ट दिली. सगळे व्यवस्थित आटपून मी ट्रेन पकडली... ओठांवर एक गाणे आले "शूर आम्ही सरदार आम्हाला (मला) काय कुणाची भीती”.. भीती.. नाहीये पण आजून आई वैगरे गावावरून येईपर्यंत आशा कितीतरी रोजच लढाया जिंकायच्या आहेत.. उद्याच्या भविष्यासाठी..


- अतिश..

Comments

Popular posts from this blog

चित्रपट : समीक्षा आणि सिद्धांत

निसर्ग