चित्रपट : समीक्षा आणि सिद्धांत
भारत हा जगात सर्वाधिक चित्रपट निर्मिती करणारा देश आहे. परंतु चित्रपट हा अभ्यासविषय म्हणून आपल्याकडे पुरेसा रुजलेला नाही. वर्तमानपत्रांचे, मासिके व अन्य नियतकालिकांचे रकानेच्या रकाने चित्रपटविषयक मजकुराने भरलेले असतात. पुरवण्याच काय, स्वतंत्रपणे चित्रपटविषयाला वाहिलेली नियतकालिके सुद्धा कमी नाहीत. आकाशवाणी, दूरचित्रवाणी माध्यमांतून देखील चित्रपटांवर भरपूर बोलले जाते. पण त्यात कुठेही गंभीर समीक्षेला स्थान नाही. त्यात प्रामुख्याने असते ते गॊसिपिंग – कुजबुज – चर्चा. मग येतात वर्तमानपत्री परीक्षणे. यात चित्रपटांच्या गोष्टी लिहिलेल्या असतात; अभिनय, संगीत, दिग्दर्शन यांच्याविषयी चार – दोन वाक्ये असतात आणि हा चित्रपट सर्वसाधारण समाजाला कितपत पाहण्याजोगा आहे, त्याचे रेटिंग – म्हणजे मूल्यांकन करणारे एखादे वाक्य किंवा स्टार्स दिलेले असतात. आणि यालाच चित्रपट समीक्षा मानण्याची प्रथा आहे. जी काही पुस्तके आहेत ती चित्रपटाचा इतिहास फुटकळपणे मांडणारी, गोष्टी सांगणारी, माहिती देणारी, आठवणीवजा... अशी. या मर्यादा ओलांडणारे लेखन अपवादानेच झाले असल्यामुळे चित्रपट अभ्यासाची आवश्यक ती भूमी करणारे विविधांगी लेखन होणे गरजेचे आहे. साहित्य, नाटक, संगीत, चित्रकला... यांसारख्या विषयांना आहे तसे स्थान अद्याप चित्रपटाला आपल्या औपचारिक शिक्षणपद्धतीत मिळालेले नाही. प्रसारमाध्यमांचे विस्तारणारे क्षितिज लक्षात घेऊन त्यासंबंधीचे करिअरकेंद्री अनेक अभ्यासक्रम सुरू झाले आहेत. त्यात चित्रपटाला काही अंशी स्थान मिळू लागले आहे. पण त्यालाही मर्यादा आहेत. विद्यापीठांमधून स्वतंत्रपणे चित्रपट अभ्यास विभाग अजूनही रुजलेले नाहीत, अथवा स्वतंत्रपणे या प्रकारचे मौलिक लेखनही क्वचितच झाले आहे आणि त्यामुळेच चित्रपट समीक्षा, चित्रपट सिद्धांत... हे शब्द आपल्या देशी भाषांमध्ये आपल्याला कृत्रिम, बोजड, उपरे वाटू लागतात.
मुळातच चित्रपट विषयक लेखनाचा जगभरातला इतिहास हा उणापुरा शंभर वर्षांचा आहे. चित्रपट हे माध्यम अवघ्या 115 वर्षांचे आहे. भारतीय चित्रपटसृष्टीला 2013 मध्ये शंभर वर्षे पूर्ण होतील आणि तरीही अन्यांच्या तुलनेत भारतात सर्वाधिक संख्येने चित्रपटनिर्मिती होते ; चित्रपटांचा समाजजीवनावरील प्रभावही प्रचंड आहे.
तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे भारतीय आणि पाश्चात्य अशी ज्ञानविश्वातली दरीही झपाट्याने दूर होत आहे. चित्रपट विषयक सगळे मौलिक लेखन इंटरनेटवर सहज उपलब्ध आहे. प्रश्न आहे तो ती ज्ञानसंस्कृती आपल्या मातीत रुजवण्याचा. भाषांतरे, चित्रपट ज्ञानशाखेचा सुलभपण सविस्तर परिचय... ही त्यासाठीची पहिली आवश्यक पायरी झाली. पण ते सर्व पचवून त्याची परिभाषा घडवणे नि प्रचलित करणे, भारतीय परिप्रेक्ष्यातून त्यावर नवीन विचारमंथन होणे... या पुढच्या पायऱया आणि म्हणूनच चित्रपट विषयीचे सैद्धांतिक विवेचन आपल्या भाषांमध्ये आणणे गरजेचे आहे. फिल्म थिअरी – बिअरी या पाश्चात्य आणि किचकट गोष्टी आहेत, त्यांचा आपल्याला काय उपयोग ? असाही मतप्रवाह आहे. पण कलेचे ज्ञान हे असे काही भारतीय वा पाश्चात्य चौकटींनी बांधून चालत नाही. त्या त्या विचारांना सामाजिक – सांस्कृतिक संदर्भ व परंपरा असतात, हे खरे असले तरी एकूण कलाविषयक जाणिवा विस्तारणाऱया मूलभूत गोष्टी त्यातून उपलब्ध होत असतात. तेव्हा ते रज्ञान असे खेळकर हवे, त्याची आयात – निर्यात होऊ देत राहिले पाहिजे.
समीक्षा म्हणजे कलाकृतीचे सम्यकपणे केलेले विवेचन. समीक्षेच्या चार मूलभूत पायऱया सांगता येतील :
1. कलाकृतीचे सूक्ष्म वाचन ( वाचन हा शब्द चित्रपटालाही तितक्याच चपलखपणे लागू होतो ), 2. विश्लेषण, 3. अर्थनिर्णयण, 4. मूल्यमापन. कुठल्याही कलाकृतीची समीक्षा ही या चार पायऱयांवर आधारलेली असते. एखादा चित्रपट चांगला – वाईट ठरवायचा तर त्याचा अर्थ नेमकेपणाने लावावा लागेल, अर्थ लावायचा तर त्याचे विश्लेषण करायला हवे, आणि विश्लेषण करायमे तर सूक्ष्म अवलोकन करावे लागेल. कशाचे सूक्ष्म अवलोकन ? – तर चित्रपटातील मूलभूत घटकांचे.
चित्रपट ही एक कलाकृती आहे आणि अनेक ध्वनी व प्रतिमा घटकांच्या संकलनातून ती सिद्ध होत असते.
चित्रपट हा सखोल अभ्यास करण्यासारखा विषय आहे.
Comments
Post a Comment