पहिला पाऊस, ट्रेन आणि त्याचे प्रेम..



रात्र जरा बेधुंद होती, वाराही मस्त वाहत होता, आभाळात ढगांचा आणि चांदण्यांचा लपाछपीचा खेळ जणू सुरु होता. तो प्लॅटफॉर्म नं. 4 वर उभा राहून ट्रेनची वाट बघत होता, त्याने त्याचे मनगट वर केले, घड्याळात पाहिले, 9.30 झाले होते. अंधेरी स्टेशन वरून घरी जायला त्याला 9.31 ची ट्रेन होती. ट्रेन येतेय हे त्याला लांबून दिसले, त्याने मागे अडकवलेली बॅग पुढे केली जणू सगळी शस्त्र गोळा करून लढण्याच्या तयारीला सज्ज झाला आहे. ट्रेन येणार इतक्यात त्याच्या  घामाने डबडबलेल्या चेहऱ्यावर पावसाचे थेंब पडू लागले, पाऊस सुरु झाला होता. त्या थंड वाटणाऱ्या पावसाच्या थेंबांनी त्याला खूप बरे वाटले. तेवढ्यात ट्रेन आली त्याच्यासारख्या कित्येक प्रवाश्यांची ट्रेन मध्ये चढण्यासाठी लढाई सुरु झाली. तो चढला, त्या 2 - 3 सेकंदात त्याने पूर्ण डब्ब्यात नजर फिरवली आणि एक विंडो सीट त्याला रिकामी दिसली जसे काही स्वर्गच भेटले या अविर्भावात तो त्या सीट वर जाऊन बसला. ट्रेन सुरु झाली आणि त्याने बॅगेतून हेडफोन्स काढले, ते  मोबाइलला कनेक्ट करून गाणी ऐकू लागला. पाऊस सुरूच होता.. वाराही सुटला होता.. काही थेंब अधून - मधून अंगावर येत होते आणि तो त्या बरसणाऱ्या पावसाच्या थेंबांतून त्याच्या भूतकाळात शिरला होता..
     पावसाच्या सुरुवातीलाच शाळा भरायची, नवा पाऊस, नवा वर्ग, नवी पुस्तके, नवे शिक्षक आणि काही नवीन मुलं - मुली. सगळे कसे मंतरलेले दिवस होते. त्या नव्या वर्गातला तो गोंधळ, त्या गाण्याच्या भेंड्या, गडगडणाऱ्या ढगांचा आवाज आणि लक्ख चमकणाऱ्या विजेचा प्रकाश सगळे त्याला आठवत होते. 
     वरून कोसळणाऱ्या थंड पावसाच्या पाण्यात गरम पाण्याने अंघोळ करण्याची जी मज्जा होती ते सगळे आज त्याच्या डोळ्यांसमोरून तरळत होते. मागच्या वर्षीच्या जुन्या वह्यांची पाने फाडून कितीतरी होड्या पाण्यात सोडायचे ते दिवस त्याला त्याच्या बालपणात घेऊन जात होते. रात्रभर ओरडणाऱ्या बेडकांचा आणि त्या रातकिड्यांचा आवाज आज त्या पहिल्या पावसाने त्याच्या कानात घुमत होता. पावसाने भिजलेले एखादे कुत्र्याचे पिल्लू त्याच्या घराच्या पडवीत ठाण मांडून बसलेले त्याच्या नजरेसमोर येत होते. 
    ट्रेन आता खूपच पुढे आली होती. पाऊसही आता थांबला होता. आणि तो अजूनही आठवणींत रमला होता, आता  त्याला तिची आठवण येत  होती, काहीच कारण नसताना उगाचच दोघांचे भांडण झाले. भांडणाचे नेमके कारण काय? हे त्याला आजून कळलेच नाहीये तरीसुद्धा त्यांच्यात खूप भांडण झालेय जे नको व्हायला पाहिजे होते. बरसणारा प्रत्येक थेंब त्याला तिची आठवण अजूनच तीव्र करून देत होता. 
   प्रेम म्हणजे नेमके काय? तुम्ही - आम्ही करतो ते प्रेम कि त्याने तिच्यावर मनापासून जे केलेय ते प्रेम. त्याला तिच्या सगळ्या गोष्टीत फक्त आणि फक्त प्रेमच दिसते. मग ते तिचे रागावणे असो, त्यांचे भांडण असो, तिने त्याला फेसबुक, व्हॉट्सअप वर ब्लॉक करणे असो, ह्या  सगळ्या गोष्टीत त्याला प्रेमच दिसते. तिचे शब्द त्याला ऐकू येत होते, तिने केलेल्या कविता त्याला साद घालत होत्या. का दोघांच्यात हा दुरावा आलाय? तिच्या आणि त्याच्या मनात प्रेम असताना का दोघे दूर गेलेत. दोघाच्या मनात एकच प्रश्न आहे तरी पण कोण बोलायला तयार नाहीये. 
   ट्रेन त्याच्या स्टेशन ला यायाला 10 मिन. बाकी होते आणि त्याची नजर वर आभाळात गेली, ढगा आडून चंद्र बाहेर येत होता. त्याचा प्रकाश चौफेर पसरत होता एक चांदणी त्या चंद्राच्या बाजूला प्रकाशत होती. तो चंद्र बघताच त्याला तिची आठवण आली. त्याने तिचा फोटो पाहिला आणि ओठांवर हलकेच काही गाण्याच्या ओळी आल्या..
                      "यूं शबनमी..
                       पहले नही थी चांदणी 
                       चांद वो भरमा गया, तुझको देखा तो शऱमा गया 
                       वो चुराने लगा है नजर..
                       यूं शबनमी.."

त्याला आशा आहे पुन्हा सगळे सुरळीत होईल, सगळे चांगले होईल, तिचा राग शांत होऊन ती हलकेच साद घालेल.तिच्या आठवणींत असतानाच  ट्रेन त्याच्या स्टेशन ला आली. आणि तो तिच्या खूप साऱ्या आठवणी घेऊन आणि तिने बोलावे म्हणून देवाला साकडे घालून ट्रेन मधून उतरून घरी गेला.. मात्र पाऊस थांबला होता पण त्याचे डोळे बरसत होते..

                                              
                                                 
                                                                                                                   - अतिश..

Comments

Popular posts from this blog

चित्रपट : समीक्षा आणि सिद्धांत

निसर्ग

कसरत तारेवरची आणि गमतीची..